लक्ष्मीपूजन म्हणजे नेमके काय?

असे म्हणतात,” जो हाताने काम करतो त्याचे पोट भरते; पण जो डोक्याने काम करतो त्याची तिजोरी भरते.” लक्ष्मीपूजनाचा खरा गर्भित अर्थ वरील वाक्यात आहे.

रंक असो वा राजा… शेतकरी असो वा उद्योगपती… कामगार असो वा कारखानदार… प्रत्येक वर्ग आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करतो. असे मानले जाते की, माता  लक्ष्मीच्या आशीर्वादानेच संपत्ती, समृद्धी घरात येते. पैसा, संपत्ती या सध्या मनुष्याची ससर्वांत मोठ्या गरज आहेत आणि याच गरजांपोटी माणूस पैसा कमवण्यासाठी जीवाचे रान करतो. काहीजण त्यात यशस्वीदेखील होतात. परंतु बरेचजण असमाधानी असतात. त्यांच्याजवळ बक्कळ पैसा, सुखसोयी असतात; परंतु मानसिक समाधान नसते. काहीजण नेहमी तक्रार करत असतात, आमच्याकडे पैसा टिकत नाही. इतरांप्रमाणे हे लोकही लक्ष्मीपूजन करतात, तरी ते दु:खी का असतात? कारण त्यांच्या गरजा खूप असतात. या गरजा भागवताना पैशाचे योग्य नियमन होत नाही. 

मित्रहो, पैशाचे योग्य नियोजन करणे हेच खरे लक्ष्मीपूजन होय… आपल्या घरातील आई, बहीण, धर्मपत्नि, मुलगी यादेखील लक्ष्मीचेच रूप आहेत, त्यांचा सन्मान करणे हेच खरे लक्ष्मीपूजन… वडिलोपार्जित संपत्तीचे जतन आणि संवर्धन करून पुढच्या पिढीला सक्षम करून सूपुर्द करणे हेच खरे लक्ष्मीपूजन… प्रत्येक माणसाच्या यशात त्याची मेहनत आणि हुशारी असतेच, परंतु त्याचबरोबर इतर बऱ्याच लोकांचेही सहकार्य असतेच, हे नाकारता येत नाही.  अडचणीच्या वेळी आपले मित्र, नातेवाईक, हितचिंतक यांची गरज लागते आणि तेही मदत करायला मागे पुढे पाहत नाहीत. ज्यानी गरजेच्यावेळी आपल्यालाआर्थिक सहकार्य केले, त्यांचे आयुष्यभर आभारी राहणे हेच खरे लक्ष्मीपूजन…  आज सगळ्यात व्यस्त असलेल्या व्यक्ती आपल्या मुलांना चांगल्या रीतीने वेळ देऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्यामधील दुरावा वाढत चाललाय. त्यांच्यामधील भावनिक बंध सैल होत आहेत . आपल्या मुलांना चांगले आर्थिक आचारविचार आणि संस्कार देणे हेच खरे लक्ष्मीपूजन …  बर्‍याच वेळा आपण स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात एवढे गुंग होतो की आपण आपल्या समाजापासून दूर जातो. ज्या समाजात आपण मोठे झालो , जिथे चांगले संस्कार मिळाले, आपण त्या समाजाला विसरतो. त्या समाजाचे आपले काही देणे आहे याची जाणीव कायम ठेवा. शिक्षण, समाजोपयोगी कार्य आर्थिक जागृतीबाबत समाजाला हातभार लावून, समाजकार्यात सहभागी होणे हेच खरे लक्ष्मीपूजन…  

आपण आपल्या वागण्यात असा सकारात्मक बदल केलात तर तुम्ही तुमचे कुटुंब, समाज यापासून दूर नाही जाणार, तुम्हाला त्यांच्या नजरेत सन्मान दिसेल. हेच तर आयुष्याचे खरे समाधान असते. या विचाराने जो आचरण करी ! तयाचे घरी लक्ष्मी पिढ्यानपिढ्या निवास करी !! कुबेर तयाचे घरी पाणी भरी  !!! यंदाची दिवाळी तुमच्यासाठी नवी आशा, नवे दृष्टीकोन, नवी स्वप्ने आणि नवे ध्येय घेऊन येवो.. ही दिवाळी आणि पुढील वर्ष सुख, समृद्धी, प्रगती, आरोग्य आणि संपत्ती घेऊन येवो. आपल्या जीवनातल्या अंधाराचा नाश होवो… सत्कर्माची वात, भक्तीचं तेल आणि आत्म जाणिवेची ज्योत लावून आपल्या ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत राहो… हीच शिवरायांचरणी प्रार्थना…!!!  माझ्या सर्व वाचक परिवार, सर्व शेतकरी बांधव, व्यापारी, व्यावसायिक यांना  दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

लक्ष्मी चंचल असते, योग्य वेळी योग्य ठिकाणी साठवा. 

एक गृहस्थ : वसई येथील माझ्या एका मित्राच्या परिचयाचे गृहस्थ मला भेटण्यास आले. वय- अंदाजे ४९ वर्षे, शिक्षण- १२ वी, २० वर्षे मर्चंट शिपिंगवर नोकरी केली; परंतु कोरोनानंतर परत नोकरी मिळणे अवघड झाले. आता पोटापाण्याचा प्रश्न असल्याने  ओळखीने १५-२० हजारांची नोकरी किंवा काही काम मिळेल का, यासाठी आले होते. 

तरुण वय: त्या गृहस्थाचे वय २५-२६ वर्षे असतानाच शिपिंगमध्ये नोकरीला लागले. चांगली कमाई व्हायची. वर्षाला सरासरी ३ ते ४ लाखांची बचत व्हायची. वर्षातून २ वेळा १-१ महिन्याच्या सुट्टीवर घरी यायचे व कमाविलेला पैसा मनसोक्त खर्च करून सहकुटुंब चैनीत राहायचे. खरेदी, पार्ट्या करणे, महाग इलेक्ट्रॉनिक वस्तू , फोन, विदेशी दारू  असे खर्च चालूच होते. पण तरुणवयात उतारवयाची तजवीज करायला मात्र ते विसरून गेले. येणारी लक्ष्मी अशीच येत राहील, हा गैरसमज त्यांना झाला होता. त्यांनी वेळोवेळी योग्य गुंतवणुक केली असती तर आज त्यांच्याकडे किमान रु. ५०-६० लाख असायला हवे होते. 

लक्ष्मी चंचल: असे आपण अनेक ठिकाणी पाहतो की एकेकाळी काजू-बदाम खाणारे आज शेंगदाण्याला महाग झाले… एकेकाळी ‘चिवाझ’ सारखी महागडी दारू पिणारे आज देशीला महाग झाले… एकेकाळी ‘ब्रिस्टॉल’ सिगारेट पिणारे आज विडीला महाग झालेत… लक्ष्मी चंचल असते. आज ज्या प्रमाणात ती आपल्याकडे येते, ती आयुष्यभर तशीच कधीच येत नसते. लक्ष्मी ज्यावेळी येते त्यावेळी गरजेपुरती वापरून तिला जमीन प्लॉट (भूलक्ष्मी), घर (गृहलक्ष्मी), शेअर्स, एफडी, एसआयपी ( धनलक्ष्मी), सोने (सुवर्णलक्ष्मी) अशा अचल स्वरूपात म्हणजे जे सहज विकता किंवा खर्च करता येणार नाही, अशा स्वरूपात बदलून जपून ठेवावी. जेणेकरून जेव्हा आपले नियमित उत्पन्न कमी होईल तेव्हा अचल लक्ष्मी तुम्हाला आधार देईल व तुम्ही तुमचे जीवन समाधानाने जगू शकाल. नाहीतर अनेक सिनेस्टार्स जे एकेकाळी कोट्यवधी कमवायचे, तेच उतारवयात एकाकीपणात मेलेले आपण पाहतो. अशी अवस्था आपली व्हायची नसेल तर चल लक्ष्मीला, उचित वेळी अचल बनवा. तरूण वयात उधळपट्टी करायची व उतारवयात मित्र नातेवाईक यांना त्यानी काटकसरीने वाचविलेले पैसे मागत फिरायचे, हे चित्र आपण आसपास पाहतो, अशा लोकांना एक रुपयाही देऊ नये, या मताचा मी आहे. कारण असे लोक अज्ञानी, भोळेभाबडे नसून ते हरामी व चैनीखोर असतात. जगप्रसिध्द गुंतवणूक तत्ववेत्ता श्री.वॉरन बफेट म्हणतात, “Do not save what is left after spending, but spend what is left after saving.”

स्वच्छता आणि समृद्धीचा थेट संबंध असतो – एक केस स्टडी

रवांडा केस स्टडी: आफ्रिकेत निर्यात व्यवसाय संधीसंबंधी एका इन्व्हेस्टमेंट फर्मसाठी एक रिसर्च रिपोर्ट बनविण्याचे काम करताना रवांडा देशाच्या अर्थव्यवस्थाबद्दल बरीच माहिती मिळाली. १९९४ साली याच देशात महाभयंकर असा नरसंहार (Genocide) घडला होता, ज्यात सुमारे १० लाख लोकांचा बळी गेला होता. अत्यंत गरिब व अस्थिर अशा या देशाने साधलेली प्रगती ही थक्क करणारी आहे. नवा सिंगापूर अशी ओळख असलेला, सर्वांत स्वच्छ देश, तसेच वेगाने आर्थिक प्रगती करणारा व सर्वांत कमी भ्रष्टाचार असलेला व ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ मध्ये खूप चांगली रँकिंग असलेला देश म्हणून रवांडा देश जगभरात नावाजला जातो. 

कशी झाली प्रगती?: रवांडातील नरसंहारानंतर रवांडा देशाला पॉल कगामे यांचे नेतृत्व लाभले. त्यांनी आपल्या देशाला स्थिर व साधन करण्यासाठी अनेक पावले उचलली व त्यांपैकी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता. जशी सिंगापूरमध्ये स्वच्छता खूप महत्त्वाची मानली जाते तसेच त्यांनीदेखील केले. त्यांनी  महिन्यातील एक दिवस सर्वांना सक्तीने सार्वजनिक स्वच्छता करण्यास भाग पाडले. त्यामुळे हा देश आता जगातील सर्वांत स्वच्छ देश मानला जातो. त्याने स्वच्छतेच्या बाबतीत न्यूझीलंड, सिंगापूरलाही मागे टाकले आहे. 

स्वच्छता तेथे शांतता: आपले मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतही वर्षानुवर्षे असे मानले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो, तिथेच शांतता नांदते. सर्व भारतीय धर्मग्रंथांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत अनेक सूचना आहेत. एखाद्या देशात किंवा समाजात शांतता प्रस्थापित करण्यात स्वच्छता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. स्वच्छ वातावरण नागरिकांमध्ये अभिमान आणि जबाबदारीची भावना वाढवते. स्वच्छता राखल्यास गुन्हेगारी कमी होण्यास मदत होते. एक निरोगी, सुरक्षित आणि अधिक शांततामय समाज, देश निर्माण होतो.  

शांतता तेथे समृद्धी: कोणत्याही देशाच्या समृद्धीसाठी शांतता ही मूलभूत गरज आहे. जेव्हा एखादे राष्ट्र किंवा समाज शांततेत असते तेव्हा तेथील नागरिक त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असतात, ज्यामुळे शेवटी संपूर्ण देशाचा व समाजाचा विकास होतो. समाजात वृद्धी आणि समृद्धी आणण्यासाठी शांतता हा एकमेव मार्ग आहे. जर आपल्याकडे शांतता आणि एकोपा नसेल, तर राजकीय शक्ती, आर्थिक स्थैर्य आणि सांस्कृतिक विकास साध्य करणे अशक्य होईल. 

स्वच्छ व्यापार जमाती व देश: जगात अनेक देश, अनेक उद्योगी समाज स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहेत. स्वच्छतेमुळे त्या देशांना व समाजांना सर्वोच्च्च प्रतिष्ठा मिळते. कारण त्यांच्याकडे शांतता व समृद्धी या दोन्ही गोष्टी आहेत. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, डेन्मार्क, सिंगापूर हे देश स्वच्छतेच्या बाबतीत सर्वोत्तम रँकिंग मध्ये येतात. तसेच जगातील सर्वांत समृद्ध व शांत देशांत त्यांची गणना होते. तर पारशी, ज्यू, जैन ई समाज स्वच्छतेमुळे व शिस्तबद्धतेमुळे प्रसिद्ध आहेत. हे सर्व समाज त्यांच्या उद्योगविश्वातील सर्वोच्च यश, श्रीमंत, समृद्धी व संयमी स्वभावासाठी जगविख्यात आहेत. तसेच जगाच्या अर्थव्यवस्थेमध्येही त्यांना मानाचे स्थान आहे. जिथे जिथे स्वच्छता आहे तिथे तिथे प्रगतीची सुरुवात आहे. स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन मा . पंतप्रधान  यांनीही स्वच्छता अभियान राबवले आहे 

आपण काय करावे?: आपल्या  वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण राखून, आपण आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकतो, आपली उत्पादकता वाढवू शकतो आणि आपल्यासाठी व इतरांसाठी एक चांगले आणि निरोगी जग निर्माण करू शकतो. एक स्वच्छ आणि व्यवस्थित घर, कामाची जागा किंवा कोणतीही व्यक्ती  सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात मदत करू शकते. स्वच्छतेमुळे राहणीमानाचा दर्जा चांगला होऊन अधिक सुसंवादी समाज व कुटूंब निर्माण होते. स्वच्छतेची सवय मानसिक स्पष्टता सुधारण्यास, तणाव व चिंता कमी करण्यास आणि सकारात्मक विचारसरणीला चालना देण्यास मदत करू शकते. तुमच्या उद्योगातही स्वच्छतेमुळे दुप्पटीने वाढ होऊ शकते.

पॅसिव्ह उत्पन्न म्हणजे काय आणि ते महत्वाचे का आहे?

१) पॅसिव्ह उत्पन्न म्हणजे काय ? : पॅसिव्ह उत्पन्न हे सामान्यत: कमी मेहनतीने किंवा अधिक प्रयत्न ना करता मिळविलेल्या उत्पन्नाचा प्रवाह म्हणून परिभाषित केले जाते. पॅसिव्ह उत्पन्न हे असे उत्पन्न आहे जे आपल्यलाला विशेष मेहनत ना करता किंवा अधिक वेळ ना देता कमावता येते. म्हणून त्याला निष्क्रिय उत्पन्न असेही म्हणतात. तर ऍक्टिव्ह उत्पन्न म्हणजे स्वतः सक्रिय होऊन कमावलेले उत्पन्न होय, विशेषत: नियमित नोकरी किंवा अतिरिक्त अर्धवेळ नोकरी किंवा बिझनेस या मार्गांनी मिळवलेले उत्पन्न होय. ऍक्टिव्ह उत्पन्न कमावण्यासाठी मनुष्य आपला वेळ आणि खूप ऊर्जा खर्च करतो. हे त्याचे मुख्य उत्पन्न स्रोत असतात म्हणजे आपल्या पैशासाठी असलेल्या वेळेचा आणि कौशल्याचा थेट एक्सचेंज. पॅसिव्ह उत्पन्नामध्ये भाड्याने मिळणारी मालमत्ता, मर्यादित भागीदारी किंवा आपला प्रत्यक्ष सहभाग नसलेल्या इतर कोणत्याही उद्योगाद्वारे साधित केलेल्या कमाईचा समावेश असतो. सहसा, पॅसिव्ह उत्पन्न हे करपात्र (Taxable) असते. सामान्यतः रिअल इस्टेट, पीअर-टू-पीअर लेंडिंग, डिव्हिडंड स्टॉक्स आणि इंडेक्स फंड्स हे पॅसिव्ह उत्पन्नाचे चार मुख्य स्रोत मानले जातात. पॅसिव्ह उत्पन्न हे असे अतिरिक्त उत्पन्न ज्यासाठी अतिरिक्त प्रयत्न न करता ते नियमित मिळत जाते. वीक एन्ड होम्स, पुस्तक रॉयल्टी, स्टॉक फोटोग्राफी रॉयल्टी हेसुद्धा पॅसिव्ह उत्पन्नाचे उत्तम मार्ग आहेत. यामुळे अधिक आर्थिक सुबत्तता मिळते. सुप्रसिद्ध अमेरिकन उद्योजक, गुंतवणूकदार वॉरेन बफे म्हणतात, “झोपेतसुद्धा आपल्याला पैसे कमविण्याचा एखादा मार्ग सापडला पाहिजे, नाही तर आपण मरेपर्यंत आपण कामच कराल.”

२) एक गोष्ट : जीवनात आर्थिक सुबत्तता मिळवण्यासाठी किमान एक तरी पॅसिव्ह उत्पन्नाचा पर्याय आपल्याकडे असला पाहिजे किंवा तो निर्माण केला पाहिजे. तरच तुमचे जीवन आरामदायक बनू शकते. पॅसिव्ह इन्कम मुळे तुम्ही इतरांपेक्षा उच्च स्थानी स्वतःला पाहाल. एकदा एक गरुड एका उंच झाडाच्या सर्वांत उंच फांदीवर एकदम निवांत आणि आरामात बसलेला होता. तो गरुड झाडावर बसून काही करत नव्हता. त्या झाडाखालून एक ससा जात होता. त्याने त्या गरुडाला आरामात बसलेले पहिले. त्याने गरुडाला विचारले, “मी सुद्धा या झाडाखाली आरामात बसू का? ” गरुड म्हणाला “हो, नक्की !” ससा त्याचे काम सोडून जमिनीवर आरामात विश्रांती घेत होता. तितक्यात तिथे एक कोल्हा आला. त्याने सश्याला पहिले. त्याने ताबडतोब सश्यावर झडप घालून त्याला तिथेच खाऊन टाकले.

या कथेतून एक मॅनेजमेंट धडा मिळतो. तुम्हाला आरामदायक जीवन जगायचे असेल, आरामात बसून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही उच्चं पदावर किंवा उंचीवर गेले पाहिजे. मित्रांनो, पॅसिव्ह उत्पन्न मिळवून तुम्ही सुद्धा स्वतःला प्रतिष्ठा आणि मानसन्मान प्राप्त करू शकता.

३) पॅसिव्ह उत्पन्न महत्वाचे का आहे?: खरेतर पैसे आणि वेळ यांचा गहन आणि परस्पर संबंध असतो. काहीजण वेळ म्हणजेच पैसा असेही म्हणतात. वेळ ही सर्वात मौल्यवान वस्तू आहे. प्रत्येकाजवळ मुबलक वेळ असतोच असे नाही. त्यामुळे कोणत्याही मार्गाने पैसा कमावण्यामध्ये आपला बराच वेळ खर्च होत असतो. गेलेला पैसा पुन्हा कमावता येतो परंतु गेली वेळ पुन्हा येत नाही. त्यामुळे वेळ ही पैश्यापेक्षा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पॅसिव्ह उत्पन्न हेसुद्धा वेळेप्रमाणेच खूप महत्वाचे असते. जीवनात चांगले दिवस आणि चांगली वेळ आणण्यासाठी पैसा हे खूप महत्वाचे साधन आहे. आपल्याकडे पॅसिव्ह उत्पन्न स्रोत असेल तर आपल्याला अधिकाधिक श्रीमंत होता येते. पॅसिव्ह उत्पन्न स्रोतामध्ये अधिक वेळ आणि ऊर्जा न खर्च करता जास्त पैसा कमविण्याची क्षमता असते. पॅसिव्ह उत्पन्नाचे स्रोत तयार करा. तुम्ही झोपेतसुद्धा पैसे कमवाल. तुम्हाला काही अधिक मेहनत न करता ऑटोमॅटिक उत्पन्न मिळत जाईल.

तथापि, पॅसिव्ह उत्पन्नाचा स्रोत तयार करणे सोपे नाही. सुरुवातीला आपला वेळ आणि वेळ खर्च करावा लागेल . तरीही, ही सर्वात फायदेशीर गुंतवणूक आहे, यामध्ये आपण निर्भयपणे आपले पैसे गुंतवू शकता.

Leave a Comment