अभिजित पाटील: लाल केळी आणि वेलची केळी या दोन प्रकारात देशातील तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांची मक्तेदारी होती.
आता करमाळ्यातील एका तरुण इंजिनियरने या दोन्ही प्रकारच्या केळीचे यशस्वी उत्पादन घेत देशभरातील व्यापाऱ्यांना आपल्या बांधावर येण्यास भाग पाडले आहे.
खरेतर केळीला गोरगरिबांचे फळ म्हणून मान्यता मिळाल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळीचे (Banana) उत्पादन घेतले जाते.
मात्र यातही रेड बनाना (Red Banana) म्हणजेच लाल केळी आणि वेलची केळी (Elaichi Banana) या दोन प्रकारात देशातील तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांची मक्तेदारी होती.
आता करमाळा (Karmala) तालुक्यातील एका तरुण इंजिनियरने या दोन्ही प्रकारच्या केळीचे यशस्वी उत्पादन घेत देशभरातील व्यापाऱ्यांना आपल्या बांधावर येण्यास भाग पाडले आहे.
लाल रंगाची केळी ही आयुर्वेदात अतिशय औषधी आणि गुणकारी म्हणून ओळखली जातात.
याचमुळे सर्व व्हीव्हीआयपी आणि उच्चभ्रू वर्गात या केळींना फार मोठी मागणी आहे.
आपल्या शेतातील G9 म्हणजे नेहमीची केळी विक्रीला नेल्यावर अभिजीत पाटील या तरुणाला तिथे लाल केळी आणि इलायची केळी पाहण्यात आली.
त्यांचा दर ऐकून अभिजीतची जिज्ञासा जागी झाली आणि त्याने याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली.
मोठमोठ्या शहरातील फाईव्ह आणि सेव्हन स्टार हॉटेल्स , रिलायन्स, बिग बास्केट, टाटा यासारख्या मोठ्या मॉलमध्ये या केळीची 120 रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे त्याला समजले.
मात्र या प्रकारची केळी फक्त तामिळनाडू आणि कर्नाटकमधील काही भागातच पिकतात, असं समजल्यावर अभिजीतने ती आपल्या करमाळा तालुक्यातील वाशिंबे इथल्या आपल्या रानात लावण्याचा निर्णय घेतला.
इलायची केळ्यांच्या उत्पादनातून लाखोंचं उत्पन्न
उजनी जलाशयाच्या काठावर अभिजीत पाटील याची शेती असून पूर्वापार इथे ऊसाचे पीक घेतले जात होते.
स्थानिक राजकारणामुळे ऊस गाळपाला अडचण येऊ लागल्याने अभिजितच्या वडिलांनी 2005 मध्ये पहिल्यांदा या भागात G9 या नेहमीच्या केळीची लागवड केली.
पुढे या केळींचे कधी दर २० रुपये तर कधी थेट 2 रुपये असे बदलत असल्याने कधी फायदा तर कधी तोटा होऊ लागला होता.
यानंतर अभिजीतने पहिल्यांदा 2015 साली वेलची केळी लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याने 7 एकरवर लागवड केली.
वेलची केळीमध्ये अनेक प्रथिने असून याचा फायदा अनेक विकारांवर होत असल्याचे मानतात.
हिरवी दिसणारी आणि केवळ 2 ते 3 इंच लांबी आणि आकाराने गोलसर असणाऱ्या वेलची केळीचा स्वाद अगदी पेढ्याप्रमाणे असतो.
गीर गायीचे शेण, गोमूत्र आणि ऊसाच्या मळीची स्लरी देत त्याने याची जोपासना केली.
दहाव्या महिन्यात अभिजीतला एकरी 12 ते 15 टन इलायची केळीचे 50 रुपये किलोप्रमाणे लाखोंचे उत्पन्न मिळाले.
यानंतर अभिजीतने ही वेलची केळी 30 एकरात केली आणि दर दहा महिन्यांनी दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळू लागले.
लाल केळीचे अनेक फायदे
यानंतर 2019 मध्ये अभिजीतने शेतात 3 एकरावर पहिल्यांदाच लाल केळीची लागवड केली.
या लाल केळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात तर सोडियम कमी प्रमाणात असल्याने हे ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
रोज दोन लाल केळी खाल्ल्याने कॅन्सर, हृदय विकार , मधुमेह, डोळ्यांचे विकार हे आजार दूर ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याचं मानलं जातं.
याशिवाय पचनसंस्था अत्यंत परिणामकारक चालण्याचे कामही या लाल केळ्यांमुळे होते.
त्यामुळेच या केळ्यांना उच्चभ्रू वर्गात फार मोठी मागणी आहे.
रासायनिक खते आणि औषधांना फाटा देत संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने जोपासना केल्याने 14 महिन्यात एकरी 18 ते 20 टन एवढा माल मिळाला.
या केळींना देखील प्रतिकिलो 50 ते 75 प्रमाणे भाव मिळत असल्याने महाराष्ट्रात केलेला हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाले.
लाल केळीची झाडे 15 ते 20 फुटांपर्यंत वाढत जातात. त्यामुळे सुरुवातीला अभिजीतलाही हे थोडे त्रासदायक वाटले.
शिवाय या केळीच्या झाडाला मोठ्या प्रमाणात पिल्ले येत असल्याने बाकीची पिल्ले वेळीच तोडण्याची खबरदारी घ्यावी लागल्याचे अभिजीतच्या वडील बाळासाहेब पाटील सांगतात.
सध्या अभिजीतचे पाहून वाशिंबे परिसरात 500 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर ही वेलची केळी आणि रेड बनाना लागवड झाली असून आता हे वाशिंबे वेलची केळी आणि रेड बनानाचे हब बनू लागले आहे.
विशेष म्हणजे हि केळी पाहण्यासाठी सध्या जळगाव, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील विविध भागातून शेतकरी येत असून जवळपास 70 लाख बेण्यांची विक्री झाल्याचे बाळासाहेब पाटील सांगतात .
सिव्हिल इंजिनिअरिंग केलेल्या अभिजित चे शेतात नवनवे प्रयोग
अभिजीतने सिव्हिल इंजिनियरिंग केल्यावर आपल्या शेतात वडिलांच्या जोडीने नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्रातील लाल केळी आणि इलायची केळीचा पहिला प्रयोग यशस्वी करुन दाखवला.
आज अभिजीतकडे 8 एकर गोल्डन सीताफळ असून यातूनही तो एकरी 5 लाखांचे उत्पन्न घेतो.
सीताफळांसोबत व्हाईट ड्रॅगन आणि रेड ड्रॅगनची लागवड केली असून यातूनही अभिजीतला एकरी 10 लाखापर्यंत उत्पन्न मिळत आहे.
सध्या अभिजित केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोल मॉडेल बनला असून राज्यभरातून रोज शेकडो शेतकरी त्याची शेती पाहण्यासाठी येत असतात.
आजही अभिजित रेड बनाना असो वेलची केळी असो अथवा गोल्डन सीताफळ असो या सर्वांचे पॅकिंग करुन स्वतःच मार्केट मध्ये पाठवत असतो.
आता देशभरातील स्टार हॉटेल आणि स्टार मॉलमधून येणाऱ्या ऑर्डरप्रमाणे माल पॅकिंग करुन पाठवत असतो.
अभिजित च्या प्रयोगामुळे केळीच्या या किमती प्रकारातील तामिळनाडू आणि कर्नाटकाची मोनोपल्ली संपुष्टात आली आहे.
आज त्याच्या बांधावर बड्याबड्या मल्टिनॅशनल कंपनीच्या टीम रेड बनाना आणि वेलची बनाना खरेदीसाठी गर्दी करु लागले आहेत.