शिस्त म्हणजे स्वातंत्र्यावर बंधन असे सर्वजण मानतात. पण ते खरं आहे का? माणसाला हवं ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतं का?
स्वातंत्र्य हे परिणामरहित असतं का? एखादी समस्या निर्माण झाल्यावर किंवा एखादी चूक दुरुस्त करण्यासाठी केलेली कृती म्हणजे शिस्त असते का?
शिस्त ही लादलेली असते का? शिस्त म्हणजे छळ, जुलूम वा जाच असतो का? शिस्तीमुळे स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं का?
शिस्त म्हणजे वरीलपैकी काहीही नाही. हातात छडी घेऊन मुलांना बदडून काढणे असा शिस्तीचा अर्थ नाही. हे तर पिसाळल्यासारखं वागणं झाले.
शिस्त म्हणजे प्रेमळ खंबीरपणा. शिस्त म्हणजे योग्य दिशा देणं. समस्या निर्माण होऊ नये म्हणून केलेली प्रतिबंधक कृती म्हणजे शिस्त.
शिस्त म्हणजे ऊर्जेला दिशा देऊन तिचा आपल्या कामासाठी उपयोग करून घेणं.
आपल्याला ज्यांच्याबद्दल आस्था आहे त्यांचं भलं व्हावं म्हणून आपण स्वीकारलेला मार्ग म्हणजे शिस्त.
शिस्त म्हणजे काही कोणाविरुद्ध केलेली कारवाई नव्हे.
शिस्त ही प्रेमदर्शक कृती आहे. काही वेळा प्रेमासाठी तुम्हाला कठोर व्हावं लागतं.
सगळीच औषधं गोड नसतात, सर्वच शस्त्रक्रिया, उपचार यातनाविरहित नसतात परंतु आपल्याला त्यांचा वापर करावा लागतो.
आपण निसर्गाकडून शिकलं पाहिजे. सर्वात उंच प्राणी-जिराफ हा आपल्याला माहीत आहे.
जिराफाची मादी उभ्या उभ्याच पिल्लाला जन्म देते. आईच्या जाड, मऊ उदरातून पिलू कठीण जमिनीवर अचानक पडतं आणि जमिनीवर बसतं.
जिराफाची आई पहिली गोष्ट काय करते तर पिलाच्या मागे उभी राहते आणि त्याला जोरात लाथ मारते.
पिलू उभं राहतं पण त्याचे पाय कमजोर आणि लटपटत असतात. पिलू खाली पडतं.
आई त्याच्या पाठीमागे जाऊन परत लाथ मारते. पिलू उभं राहतं पण पुन्हा खाली बसतं. पिलू आपल्या पायावर उभं राहून हिंडूफिरू लागेपर्यंत आई त्याला लाथ मारत राहते. का बरं?
कारण आईला माहीत असतं की पिलू जर आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं तरच जंगलात त्याचा निभाव लागेल.
नाहीतर हिंस्र श्वापदं त्याला आपलं भक्ष्य बनवतील.
जिराफाच्या आईची ही कृती मायेपोटीच केलेली आहे ना? तुम्ही नक्कीच हो म्हणाल.
प्रेम आणि शिस्तीच्या वातावरणात वाढलेली मुलं आईवडिलांचा आदर करायला शिकतात मोठेपणी आणि कायदयाचे पालन करणारे नागरिक होतात. याच्या बरोबर उलटही होऊ शकतं.
घरोघरी जर शिस्तीचं पालन केलं गेलं तर तारुण्यातील गैरवर्तणूक ९५ टक्क्यांनी कमी होईल.- जे. एडगर हूवर
एखादया गोष्टीची जबरदस्ती केल्यामुळे मुले काही काळ नाराज होतील;
पण तेवढ्याने चांगले पालक बिचकून मागे हटत नाहीत.
शिस्तीने स्वातंत्र्य मिळते.
मुलाला डबाभर चॉकलेटस् एकदम खायला दिली तर तो नक्कीच आजारी पडेल. पण एका वेळी चॉकलेटचे एक किंवा दोन तुकडे खाण्याची शिस्त मुलाला लावली तर चॉकलेट खाण्याचा आनंद त्या मुलाला अनेक दिवस घेता येईल.
आपल्या सहज प्रवृत्तीमुळे आपण परिणामाची फिकीर न करता काय पाहिजे ते करतो.
इच्छेनुसार पूर्ण आनंद घेतल्यामुळं स्वातंत्र्य मिळत नसतं तर इच्छेवर नियंत्रण ठेवल्यामुळं ते मिळतं. -एपिक्टेटस
स्वातंत्र्य म्हणजे मनात येईल ते करायचं ही कल्पना चुकीची आहे.
आपल्या इच्छेनुसार आपल्याला नेहमीच सगळं मिळणं शक्य नसतं.
बऱ्याचदा चांगली मूल्ये आणि शिस्त यांचे फायदे सहजी लक्षात येत नाहीत.
या उलट केलेलं स्वच्छंद, बेशिस्त वर्तन अधिक फायदेशीर, आनंद देणारं आणि सोयीस्करही वाटू शकेल.
अशा वेळी शिस्तीच्या अभावामुळे यशापासून दूर राहिलेल्या लोकांची अनेक उदाहरणे लक्षात घेणं गरजेचं आहे.
आपल्याला खाली ओढतेय असं प्रथम वाटतं पण खरं म्हणजे शिस्त आपल्याला वरच्या पातळीवर नेत असते. आपल्या यशाला उपकारक ठरत असते.
एक मुलगा वडिलांबरोबर पतंग उडवत होता. पतंग कशामुळे आकाशात वर उडत राहतो, असं त्याने वडिलांना विचारलं.
वडील म्हणाले, ‘दोरा.’
मुलगा म्हणाला, ‘बाबा, दोरा तर पतंगाला खाली धरून ठेवतो.’ वडिलांनी दोरा तोडला आणि म्हटलं, “आता काय होतंय ते सांग?”
पतंगाचे काय झालं असेल असं तुम्हाला वाटतं? तो खाली आला.
आपल्या आयुष्याबद्दल असंच म्हणता येईल. काही वेळा जी गोष्ट आपल्याला खाली ओढतेय असं आपल्याला वाटतं तीच गोष्ट आपल्याला भरारी मारायला मदत करत असते. ही गोष्ट म्हणजेच शिस्त.
लेख आवडला तर पुढे शेयर करा….