बोधकथा: आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.

बोधकथा सर्वांनाच आवडतात परंतु कथेमधून चांगला बोध निघाला तर त्या कथा वाचायला आणि अनुकरण करायला निश्चितच चांगले असतात आणि म्हणूनच आज आपण ज्या कथा पाहणार आहोत.

त्यातून निश्चितच चांगला बोध निघतो आणि याचा उपयोग आपल्याला आपले संस्कार घडवण्यासाठी निश्चितच होतो.
आज आपण ज्या मराठी बोधकथा पाहणार आहोत त्या बोधकथा संस्कारक्षम तसेच चांगला माणूस घडविणाऱ्या कथा आहेत मला माहित आहे.

एक चांगला समाज घडवायचा असेल तर नक्की च लहानपणी चांगले संस्कार झाले पाहिजेत.

पण आजकाल आपण इतके बिझी झालोय की नोकरी पैसा इ, इ.. गोष्टींत इतके अडकलोय की आपली तरुण पिढी बिघडत चालली आहे याचंही पालकांना भान नाहीये.

मुलं जेव्हा एकटी असतात न तेव्हा त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांना सांगितलेले विचार व तुम्ही केलेले संस्कार त्यांच्या सोबत असतात.

पण ते मुलं एकटं असताना किंवा मित्र मैत्रिणी सोबत असताना जर पालकांचे विचार त्यांच्या सोबत नसतील तर नक्कीच ते वाईट विचार स्वीकारतील.

त्यामुळे या कथा वाचा तुमच्या मुलांना या किंवा इतर चांगल्या गोष्टी सांगा. ते कोणत्याही परिस्थितीत वाईट मार्गावर जाणार नाहीत याची काळजी पालकांनी च घ्यायला हवी

तुम्ही या कथा निश्चित वाचाल आणि त्याप्रमाणे अनुकरण कराल व आपले जीवन संस्कारक्षम बनवाल.

हे ही वाचा

बोधकथा एक: वाटाघाटींचे आणि समान दुवा शोधण्याचे कौशल्य

वडिलांनी संपत्ती म्हणून तीन मुलांसाठी १७ बदके ठेवली होती.

वडिलांचे निधन झाल्यावर मुलांनी त्यांचे इच्छापत्र उघडले.

त्यामध्ये लिहिण्यात आले होते, की १७ पैकी निम्मी बदके थोरल्या मुलाला देण्यात यावीत. १७ बदकांमधील एक तृतीयांश बदके मधल्या मुलाला मिळावीत आणि धाकट्याला १७ पैकी एक नवमांश बदके मिळावीत.

त्यामुळे वाटणी कशी करायची असा पेच त्यांना पडला. कारण १७ च्या निम्मी बदके कशी द्यायची हा मोठा प्रश्न होता.

पुन्हा एक तृतीयांश बदके, एक नवमांश बदके कशी द्यायची असाही प्रश्न होता. त्यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते गावातील एक बुद्धिमान शेतकऱ्याकडे गेले.

त्या शेतकऱ्याने त्याच्या अंगणातील बदकांमधून एक बदक घेतले आणि तो त्या तीन मुलांच्या घरी आला.

त्याने त्यांच्या सतरा बदकांमध्ये स्वतःच्या एका बदकाची भर घातली. आता १८ बदके झाली होती. त्या मुलांच्या वडिलांच्या इच्छापत्राचे वाचन त्या बुद्धिमान शेतकऱ्याने सुरू केले.

शेतकरी म्हणाला, आता १८ च्या निम्मे म्हणजे ९ म्हणून थोरल्या मुलाला ९ बदके. १८ चे एक तृतीयांश म्हणजे १८ भागिले तीन. त्याचे उत्तर येते ६. म्हणून मधल्या मुलाला सहा बदके.

धाकट्याला एक नवमांश बदके द्यायची असल्याने १८ भागिले ९ म्हणजेच उत्तर येते दोन. त्यामुळे त्याच्या वाटणीला दोन बदके येणार.

आता मोठ्याला ९, मधल्याला ६ आणि धाकट्याला २ बदके दिली, की एक बदक शिल्लक राहते. ते मी घरून आणलेले माझ्या मालकीचे आहे.

तात्पर्य : वाटाघाटींचे आणि समान दुवा शोधण्याचे कौशल्य महत्त्वाचे असते. ते त्या बुद्धिमान शेतकऱ्याकडे होते. त्यामुळेच कुठलाही प्रश्न समोर आला, की त्यावर उपाय आहे आणि मार्ग निघू शकतो असा विश्वास आपल्याकडे असला पाहिजे.

बोधकथा दोन : चांगली संगत नसेल तर एक देवमाणूस राक्षस बनू शकतो. कुसंगत नेहमी टाळा, चांगली संगत धरा.

एका गावात एक चित्रकार राहत होता. त्याला वाटले की, आपण एका चांगल्या गोष्टीचे चित्र काढावे. त्याला कोणी चांगली व प्रामाणिक व्यक्ती मिळाली नाही.

एक दिवस पहाटे गावाबाहेर जात असताना त्याला एक सुंदर दृश्य दिसले. गावाबाहेर समोर नदी वाहत होती. नदीच्या बाजूला हिरवळ पसरली होती. त्यावरून एक गुराखी आपली गुरे घेऊन चालला होता व चालताना सुंदर बासरी वाजवत होता.

आपण कृष्णाचेच रूप पाहतो आहे, असे त्या चित्रकाराला वाटले. त्याला तो गुराखी एक चांगला आणि आनंदी माणूस वाटला. पोटासाठी प्रामाणिकपणे कमवत होता.

चित्रकाराने त्याचे सुंदर चित्र काढले. चित्राला नाव दिले देवमाणूस ! त्याचे ते चित्र प्रसिद्ध झाले. त्याला त्यासाठी बक्षीस मिळाले.

काही वर्षे लोटल्यानंतर त्याला वाटले की, आता आपण एका वाईट व्यक्तीचे चित्र काढावे, तो एका तुरुंगाधिकाऱ्याला भेटला व तशी परवानगी घेतली.

तुरुंगात फिरताना एका खुनी व दरोडेखोर असलेल्या कैद्याला पाहिले. तुरुंगाधिकाऱ्याची परवानगी घेऊन चित्रकार त्या कैद्याचे चित्र काढू लागला.

चित्र काढण्यात मग्न असताना त्याला रडण्याचा आवाज आला. त्याने वळून पाहिले तर तो कैदी रडत होता.

त्याने रडण्याचे कारण विचारले. तो कैदी चित्रकाराला म्हणाला, साहेब तुम्ही काही वर्षांपूर्वी एका गुराख्याचे चित्र काढले होते. देवमाणूस म्हणून, मीच तो गुराखी. मला नंतर वाईट संगत लागली.

त्यामुळे मी जुगारी झालो, त्यासाठी चोऱ्या केल्या दरोडे घातले, खूनही केलेत. इतका वाईट झालो की, आता राक्षस म्हणून माझेच चित्र काढायची वेळ आली. चित्रकार थक्क झाला.

तात्पर्य : चांगली संगत नसेल तर एक देवमाणूस राक्षस बनू शकतो. कुसंगत नेहमी टाळा, चांगली संगत धरा.

बोधकथा तीन: परिस्थिती कशीही असुद्या लोभ करू नका.

एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता.
त्याला कोणीतरी सांगितले की ‘तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर.
तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल’. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो.

इंद्र त्याला म्हणतो, की ‘तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईन. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. ‍

तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो.

त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते.

तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो.

तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते.

सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.

तात्पर्य: कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.

लहानमुलांना हुशार कसे करावे.

बोधकथा चार: सवय बदला आयुष्य बदलेल.

एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता.
पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई.

अखेर एके दिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्या हातून ते तसेच उघडे राहिले होते.

माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-यातुन बाहेर निघून गेला.

पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते.

तो पोपट एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्या ने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते.

पिंज-यात आयते खायची सवय असल्यााने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.

तात्पर्य: जास्त काळ पारतंत्र्यात (गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते.

मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही.

परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या मूळ संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.

बोधकथा पाच: प्रसंगाचे भान ठेवावे

एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत.

एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल?


सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे.

हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे.

त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.

उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, “हे हंस गोल गोल काय नेत आहेत?” कासव रागावले ते हंसाला म्हणणार होते.

“या मूर्खांना एवढेही समजत नाही का?” त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.
तात्पर्यः समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.

1 thought on “बोधकथा: आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.”

Leave a Comment