छत्रपती संभाजीनगर शहरातील एका विवाहित डॉक्टर तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेत प्रामुख्यानं दिसतं ते गॅसलायटिंग.
– मी आत्ता घरी आल्यावर बागेतला नळ चालू केला.. तुला नळाचा आवाज ऐकू आला असा भास झाला असेल…
– कोणाला फोन केला होतास?
– तुझा भाऊ सारखा कशाला येतो?
– हे झगमगीत कपडे आत्ता घालायला हवेच होते का?
– त्या समारंभात तुला अमुकतमुकच्या बरोबर बसून जेवायची काय गरज होती?
– मी असं कधीच म्हणालो नाही.. तुला आठवत नाही आजकाल
– कुठे गेला माझा टाय, आजकाल तू गोष्टी कुठे ठेवल्या ते कायम विसरतेस.. आता उशीर होणार मला..
– तू कर ते काम पण मग माझी जेवायची वेळ आहे ना ती..
– तू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जरा जास्तच संवेदनाशील असतेस..
– तुला हा प्रश्नच कसा पडला, मी तुझ्याशी खोटं बोलेन का?
– इतक्या छोट्या गोष्टीचं अवडंबर का माजवते आहेस?
साधारणपणे “गॅसलायटिंग” या प्रकाराला अशा छोट्या गोष्टींनी सुरुवात होते. हळूहळू ज्या व्यक्तीचं गॅसलायटिंग होत असतं ती व्यक्ती स्वत:ची मतं, स्वत:चे निर्णय याबद्दल साशंक होत जाते.
तिच्या बाबत रोजच्या आयुष्याकडे साफ नजरेनं पाहून ठाम निर्णय घेणं हे हळूहळू बंद होत जातं. मानसिक आणि पर्यायानं शारीरिक आरोग्यावर याचा परिणाम होत जातो. नातं तुटेल या भीतीनं अनेकदा समोरची व्यक्ती ते सहन करत रहाते.
संभाजीनगरमधल्या आत्महत्या करणा-या स्त्रीनं जे लिहिलं आहे त्यात या सगळ्याचं स्वच्छ प्रतिबिंब उमटलेलं आहे..
“डिअर अहो, खूप प्रेम केलं हो तुमच्यावर जिवापाड केलं. स्वत:ला विसरुन गेले तुमच्यासाठी… माझ्यासारख्या हसत्याखेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही, एका स्वावलंबी मुलीला dpendent बनवलं.
खूप स्वप्न घेऊन लग्न केले होतं तुमच्याशी. हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील, आपली छोटीशी फॅमिली असेल… तुम्हाला मुलगा लागत होता ना त्याचीच तयारी करत होते मी… गोंडस बाळ असतं आपलं तर आज ही वेळ आणलीत तुम्ही माझ्यावर.
तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं मी… मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आई-वडिलांशी, भावाशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा, म्हणून त्यांनाही बोलत नव्हते जास्त. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही.
मोबाईल बदल म्हणाले, बदलला… नंबर बदलण्यासाठी वाद घातले, त्यासाठी पण तयार झाले. पण तुमचे doubts काही संपतच नाही. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेतात. पण देवाशप्पथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आहे आणि राहील… माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.”
समोरचा माणूस आपलं ऐकत नाही किंवा जे बोलतो ते आपल्याला समजत नाही असा आरोप करणं, समोरच्या माणसाला एवढं कसं आठवत नाही असं विचारुन त्याच्या स्मृतीबद्दल त्याच्याच मनात शंका निर्माण करणं, समोरच्या माणसाचं संभाषण थांबवून विषयाचा ओघ बदलणं, समोरच्या माणसाच्या गरजा किंवा भावना फार महत्वाच्या नाहीत असं दाखवणं, आपण आधी एखाद्या गोष्टीला तयार होतो किंवा अनुमोदन दिलं होतं याचा साफ इन्कार करणं.. अशा प्रकारची तंत्रं यात वापरली जातात.
एखाद्या व्यक्तीला त्यांच्या स्वत:च्या अस्तित्वाबाबत, वागण्याबाबत, स्मरणशक्तीबाबत, दृष्टिकोनांबाबत किंवा मानसिक स्वास्थ्याबद्दल शंका निर्माण व्हावी अशा रीतीनं मॅनिप्युलेट करणं.. या प्रकाराला मानसशास्त्रज्ञ “गॅसलायटिंग़” म्हणतात. हे खूप घातक आहे असं “येल सेंटर फॉर इमोशनल इंटेलिजन्स”चा संचालक आणि “द गॅसलाईट इफेक्ट” या पुस्तकाचा लेखक रॉबिन स्टर्न याचं म्हणणं आहे.
२०१८ मध्ये आॉक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीतला “वर्ड आॉफ द इअर” ठरलेला “गॅसलायटिंग” हा शब्द आला तो १९४४ मधल्या “गॅसलाईट” या नाटकावरुन आणि त्यानंतर त्याच नावाच्या चित्रपटावरुन.
चित्रपटात इनग्रिड बर्गमननं यात पॉलाचं काम केलं होतं. या चित्रपटात इटलीत संगीत शिकणारी पॉला आपल्याहून वयस्कर असलेल्या ग्रेगरीच्या प्रेमात पडते. लग्न करुन पॉलाच्या इंग्लंडमधल्या घरात रहाण्याचा ग्रेगरी आग्रह करतो. ज्या घरात आपल्या आत्याचा खून झाला त्या घरात जरा नाराजीनंच पॉला रहायला जाते.
सुरुवातीला सगळं ठीकठाक असतं. पण नंतर पॉलाची स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटायला लागते. घरातलं चित्र किंवा तिचा हि-याचा दागिना कुठे ठेवलाय अशा गोष्टी तिला आठवत नाहीत. खोलीतले गॅसवर चालणारे दिवे मधूनच मंदावतात असे तिला भास सुरु होतात. चित्रपटाच्या अखेरीस ग्रेगरीनंच पॉलाच्या आत्याचा हि-यांसाठी साठी खून केल्याचं उघडकीस येतं.
आत्यानं त्याच हवेलीत लपवलेले हिरे मिळावेत यासाठी ग्रेगरी पॉलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. तिला स्वत:चे विचार, निर्णय याबाबत प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करतो. तिला वेड लागलं आहे असं सिध्द करुन इस्पितळात पाठवण्याचा त्याचा डाव असतो. यासाठी गॅसचे दिवे मंदावण्याचं कामही ग्रेगरीच करत असतो.
गॅसलायटिंग नेहमी खूप गंभीर किंवा उग्र प्रकारात वापरलं जातं असं नाही. दैनंदिन आयुष्यातही हा प्रकार अनेकदा सहज घडतो. गॅसलायटिंग हे नवराबायको किंवा पालक आणि मुलं अशा वैयक्तिक नात्यात; मॅनिप्युलेटिव्ह बॉस किंवा सहकारी अशा व्यावसायिक नात्यात किंवा राजकीय नेत्यांकडूनही कायम होत असतं.
गॅसलायटिंग करणारा माणूस सहसा सत्ता गाजवण्यासाठी ते करतो. आपण म्हणतो तोच दृष्टिकोन योग्य आहे अशी ठाम मतं असणारे पालक किंवा इतर व्यक्ती यांना दुस-याचा चा दृष्टिकोन चुकीचा आहे असं खात्रीनं वाटतं.. त्यांच्याकडून अनेकदा “गॅसलायटिंग” केलं जातं.
नेटफ्लिक्सवरच्या “रे” या मालिकेतली “फरगेट मी नॉट”; क्रिमिनल जस्टिस या मालिकेतल्या दुस-या सीझनमधली अनु, कुसुम मनोहर लेले हे नाटक ही याची उदाहरणं आहेत.
सर्वच निर्णय घेणं दरवेळी जड जात असेल, सतत स्वत:ला तपासून पहात असाल, तुम्ही खूप संवेदनाशील आहात किंवा वाईट आहात अशा कोणी तरी केलेल्या आरोपांबद्दल सतत रवंथ करत असाल, माझा/माझी जोडीदार इतकी चांगली आहे..
पण मी त्याला/तिला गमावून बसेन का असा मनात कायम गोंधळ उडत असेल, तुम्हाला ज्या वादात पडायचं नसेल त्यात तुम्ही अचानक ओढले जात असाल किंवा एखादी गोष्ट तुम्ही परत परत सांगून समोरचा माणूस ऐकत नसेल, भावना/विचार/वागणं याबद्दल सतत साशंक असाल, सतत कोणाची तरी माफी मागण्याची वेळ येत असेल किंवा काहीतरी चुकतंय याची जाणीव असली तरी काय नक्की चुकलं आहे ते कळत नसेल तर तुम्ही गॅसलायटिंगचे बळी असू शकता.
गॅसलायटिंग करणा-यांवरचं एक सर्वेक्षण : अशी माणसं स्वत:च्या वाईट वागण्याची जबाबदारी टाळण्यासाठी आणि दुस-या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे मार्ग अवलंबत असतात. यात अचानक एखाद्या वेळी प्रेमाचा वर्षाव करणं, महागड्या भेटवस्तू देणं, समोरच्या व्यक्तीला शिस्तबध्दपणे आपले नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींपासून तोडणं हे प्रकार घडत असतात.
महागड्या भेटवस्तूमुळे समोरची व्यक्ती आपल्या ऋणात राहिल आणि नियंत्रण गाजवणं सोपं जाईल अशी गॅसलाईट करणा-या व्यक्तीची अपेक्षा असते. तसंच अशी व्यक्ती अनपेक्षित वागण्यात पटाईत असते. समोरच्या व्यक्तीशी बोलणं बंद करणं, अजिबात प्रेम, काळजी न दाखवणं थोडक्यात “कोल्ड शोल्डर” प्रकारचं वर्तन करते.
असं करणा-या व्यक्तीला पर्सनॅलिटी डिसआॉर्डर विशेषत: नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसआॉर्डर असू शकते.
संकलन: फेसबुक
फोटो साभार : फेसबुक, गुगल