एवढ्या भयंकर गोष्टीबद्दल आपल्या समाजात काहीही जागरूकता नाही हे दुर्दैव आहे.

जागरूकता का महत्वाची?

एक स्त्री लहान बाळाला घेऊन धावत येते. सोबत आरडा ओरडा करत रडणारी एखाददुसरी बाई आणि एखादा पुरुष असतो.

साधारणपणे पहाटे पाच ते सकाळी आठच्या दरम्यानची वेळ असते.

एखाद दोन दिवसाआड अशी केस दवाखान्यात येतेच. सगळ्या केसमध्ये कमीजास्त प्रमाणात घटनाक्रम सारखाच असतो.

      बाळाचं वय साधारणपणे सहा महिन्यांच्या आत असतं, थोडंफार कमी जास्त! कुटुंब घाबरलेलं असतं… बाळाची हालचाल होत नसते, शरीर थंड पडलेलं असतं, काळंनिळं झालेल असतं.

नाडी लागत नाही, डोळ्याच्या बाहुल्या प्रसरण पावलेल्या असतात, ECG काढला जातो… रेषा सरळ येते…‌ते बाळ जिवंत नसतं!

        बाळाच्या आईला, वडिलांना ही गोष्ट सांगणं म्हणजे… फार वाईट असतो तो सगळा अनुभव.

सुरूवातीला धीर होत नाही पण शेवटी सांगावंच लागतं. कालपर्यंत ठणठणीत असणारं, छान खेळणारं, ताप नाही, कसला आजार नाही.

शांत झोपलेलं बाळ नेमकं आज का उठलं नाही?

        ती आई आपलं बाळ जिवंत नाही हे मान्यच करत नाही!

काही वेळ गेल्यानंतर एक प्रश्न आम्ही त्या आईला किंवा नातेवाईकांना विचारतो की, 

       ‘पहाटे बाळाला दूध पाजवलं होतं का?’

       त्यांचं उत्तर ‘हो’ असतं!

       पुढे तुम्ही जे वाचणार आहात ते फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला कळावं म्हणून शक्य होईल तेवढ्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय.

होतं असं की, लहान बाळाला दूध अधूनमधून पाजवत राहावं लागतं. दूध ओढताना काही प्रमाणात हवा सुद्धा बाळाच्या पोटात जाते. ही हवा बाहेर काढणं आवश्यक असतं. 

       डॉक्टरांनी अगदी बजावून सांगितलेलं असतं की, दूध पाजवल्यानंतर बाळाच्या पाठीवर थाप मारून ढेकर काढायचा. बाळाने ढेकर दिल्याशिवाय झोपी घालायचं नाही. अडकलेला ढेकर बाळला अस्वस्थ करत असतो, ती हवा पोटातल्या अन्नाला वरच्या भागात ढकलत असते.

       दुर्दैवाने चारशे- पाचशे बेबीपैकी एखाद्याची वेळ खराब असते. साधारणपणे पहाटे अशी केसेस घडते.

दिवसभर थकून गेलेली आई पहाटे झोपेत असते, गुंगीत असते. बाळाला दूध पाजवून तशीच झोप लागते, ढेकर निघत नाही... पोटातलं दूध फुफ्फुसात जातं! झोपेत तडफडून मृत्यू होतो, कोणाला कळतही नाही. 

         एखाद्या केसमध्ये कधी कधी कंटाळा करून बाळाला मांडीवर न घेता झोपूनच दूध पाजवलेलं असतं. त्याचेही परिणाम असेच वाईट होऊ शकतात. कधी कधी आई झोपेत असते, बाळाला किती दूध प्यायचं हे कळत नाही. पोट भरलं तरी पिणं सुरूच असतं… पोट गच्च भरुन श्वासनलिकेमध्ये दूध जातं. बाळ काळं निळं पडतं… मृत्यू होतो!

         सकाळी आई उठून आपल्या कामाला लागते, बाळ पलंगावर झोपलेलं असतं. बराच वेळ होतो, नेहमी हालचाल करणारं लेकरू आज शांत का म्हणून जवळ जाऊन बघते… शरीर थंड असतं! रडारड सुरू होते आणि सुरूवातीला सांगितलेली कहाणी सुरू होते!

       या सर्व गोष्टीत त्या बिचाऱ्या आईची काही चूक नसते. असं काही घडू शकतं याची खरंतर माहितीच नसते, कोणी सांगितलेलंच नसतं.

एवढ्या भयंकर गोष्टीबद्दल आपल्या समाजात काहीही जागरूकता नाही हे दुर्दैव आहे.

डॉक्टर सांगतात ढेकर काढा पण कधीतरी मृत्यूही होऊ शकतो एवढंही स्पष्ट सांगत नाहीत… सांगितलं पाहिजे, एवढ्या महत्त्वाच्या विषयावर जागरूकता झाली पाहिजे!

       साधारणपणे जी छोटी कुटुंबं आहेत… जिथे नवरा, बायको यांच्याशिवाय शिवाय लहान बाळाकडे लक्ष द्यायला कोणी नाही त्या घरात अशा गोष्टी घडण्याची शक्यता जास्त असते.

म्हणून म्हणतात घरात एकतरी म्हातारं माणूस असावं. ज्या घरात म्हातारी, अनुभवी बाई असते त्या घरात ही वेळ येत नाही... ढेकर काढल्याशिवाय ती बाळाला झोपूच देत नाही!

        इमर्जन्सी विभागात काम करताना अशा केसमधील शेवटचा सर्वात कठीण टप्पा असतो पोस्ट मॉर्टम! मृत्यूचं कारण शोधण्यासाठी बाळाचं पोस्ट मॉर्टम करावे लागते आणि ही गोष्ट त्या आईला समजावून सांगणं फार फार कठीण असतं! कितीतरी प्रसंग बघितले कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झालेली असते, डॉक्टर तयार असतात पण ती आई छातीला कवटाळलेलं बाळ सोडायला तयार नसते… 

पोस्ट मॉर्टममध्ये फुफ्फुसात दुधाच्या छोट्या छोट्या गुठळ्या सापडतात. (जागरूकता)

        अशीच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कधीतरी झोपेत असताना चूकून आईच्या अंगाखाली बाळ येतं आणि गुदमरून मृत्यू होतो. म्हणून आईच्या आणि बाळाच्या मध्ये छोटी उशी वगैरे ठेवतात, अर्थात घरात कोणी जुणं जाणतं असेल तर या गोष्टी टाळता येतात.

        माफ करा मी काही गोष्टी फारच स्पष्ट लिहील्या आहेत, भाषा अंगावर येणारी आहे. आपल्या आजूबाजूला असंही काही घडत असतं आणि ते कधीतरी आपल्या कुटुंबासोबत सुद्धा हे घडू शकतं हे आपल्यालाही कळावं म्हणून हा लेख. थोडी जागरूकता आणि एक जीव जरी वाचला तरी आनंद आहे.

Take care आणि नक्की शेयर करा..

लेखक : unknown

फोटो साभार: गुगल , unicef

Leave a Comment