आगे बढ़ने के लिए जेब नहीं, सोच बड़ी होनी चाहिए : लक्ष्मणराव किर्लोस्कर

एखादा उद्योग जेव्हा उभा राहतो, तेव्हा तो फक्त एका माणसाला उभा करत नाही, तर तो एका समाजाला उभारी देतो. आगे बढ़ने के लिए जेब नहीं, सोच बड़ी होनी चाहिए : लक्ष्मणराव किर्लोस्कर

आणि त्यात जर तो उद्योग उभारण्यामागे हेतूच समाजाची प्रगती असेल मग तर, समाज प्रस्थापित सर्व जुनाट रूढी परंपरा मोडून एका नव्या पर्वाला सुरुवात करतो.

असंच काहीसं कार्य केलं आहे, पहिले मराठी उद्योजक लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांनी.

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ रोजी तेव्हा महाराष्ट्रात असणाऱ्या बेळगावमधील गुर्लहोसूर येथे झाला.

पांडित्याचा व्यवसाय असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मणरावांचं मन काय त्यात लागायचं नाही. सतत कानावर पडणाऱ्या वेद आणि मंत्रांऐवजी त्यांचं मन यंत्रांत, चित्रात रमत होतं.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पंडितांच्या मुलानं पांडित्यच करायचं या मानसिकतेच्या त्या काळात लक्ष्मणरावांनी बंडखोरी करत मुंबईच जे जे स्कूल ऑफ आर्टस् गाठलं. तिथं त्यांनी पेंटिंग आणि मेकॅनिकल ऑब्जेक्ट्स यासाठी प्रवेश घेतला.

त्यांचं मन त्यांच्या आवडत्या विषयात म्हणजेच पेंटिंगमध्ये लागत होतं, तोच त्यांना सौम्य प्रकारचा रंगांधळेपणा जाणवू लागला.

पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. या आजारामुळे त्यांनी पेंटिंगमधलं आपलं लक्ष पूर्णपणे मेकॅनिकल ऑब्जेक्ट डिझाईन म्हणजेच यंत्रांचं चित्र काढण्याकडे दिलं.

यामुळे मूलतः यंत्रांची आवड असणारे लक्ष्मणराव यंत्रांच्या अधिकच जवळ गेले.

त्यांनी यांत्रिक चित्रकलेमध्ये इतकं प्राविण्य मिळवलं कि, त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबली टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजेच VJTIमध्ये ते मेकॅनिकल ड्रॉईंगचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून महिना ४५ रुपये पगारावर तर रुजू झाले.

ती वेळ अशी होती, जेव्हा ब्रिटिशांनी भारतात सायकल वापरायला सुरुवात केली होती. ते यंत्र बघून लक्ष्मणरावांनी सरळ त्याची डीलरशिप घेतली.

मुंबईत सायकल खरेदी करून ते बेळगावला पाठवत. तिथं त्यांचा भाऊ रामूअण्णा ती सायकल ७०० ते हजार रुपयांना विकत होते, तर तिथल्या लोकांना सायकल शिकवायचे १५ रुपये घ्यायचे.

१८८८ मध्ये लक्ष्मणरावांनी आपली नोकरी सोडली आणि बेळगाव गाठलं. तिथं त्यांनी आणि रामूअण्णांनी मिळून एक छोटं सायकल रिपेअरचं दुकान चालू केलं आणि व्यावसायिक क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं.

त्यांचा हा छोटासा व्यवसाय चांगला चालू होता. तोच महानगरपालिकेने अतिक्रमण म्हणून त्यांचं दुकान काढून टाकलं.

भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्रे बनवण्याची त्यांची इच्छा होती. १९०१ मध्ये त्यांनी त्याकाळच्या औरंगाबाद स्टेटमध्ये एक छोटं दुकान चालू केलं.

जनावरे वैरणीतील बुडख्याकडील मोठा भाग खात नाहीत आणि तो वाया जातो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यातून त्यांचे पहिले यंत्र तयार झाले ते कडबा कापण्याचे.

त्याचबरोबर ते शेतीसाठी लागणारी रहाट, चरख आणि लोखंडाचा नांगर बनवत होते.

पण त्यावेळच्या शेतकऱ्यांमध्ये अशी अंधश्रद्धा होती की लोखंडाचा नांगर वापरला, की माती विषारी बनते आणि तिची उत्पादनक्षमता कमी होते.

शेतकऱ्यांच्या मनातला हा गैरसमज दूर करायला लक्ष्मणरावांना तब्ब्ल २ वर्ष लागली, नंतर मात्र शेतकऱ्यांनी तो नांगर स्वीकारला.

लक्ष्मणरावांना आपला व्यवसाय वाढवायचा होता, पण दिशा मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा दरबार गाठला.

दूरदृष्टी असणाऱ्या राजांनी लक्ष्मणरावांच्या अंगची कला आणि त्यांचं यंत्रांप्रती असणारं प्रेम पाहून संस्थानाचा नकाशा मागवून हवी ती जागा निवडायला सांगितलं. लक्ष्मणरावांनी कुंडल रोडजवळील ३२ एकर ओसाड जमीन निवडली. राजांनी व्यवसाय उभारण्यासाठी १० हजार रुपयेसुद्धा दिले.

कुंडलजवळची ही जमीन म्हणजे निवडुंगांनी गच्च भरलेलं ओसाड माळरान. तिथं राहायचे ते भयानक विषारी असे साप आणि सरडे. (सोच)

या भकास माळरानावर औद्यगिक नगरीरुपी नंदनवन उभं करायचं स्वप्न उराशी घेऊन लक्ष्मणराव आणि रामूअण्णा कामाला लागले.

त्यावेळी देखील जास्त शिकलेली माणसं देखील गोऱ्यांच्या दरबारी नोकऱ्या करत. आपल्याला जास्त शिकलेल्या माणसांपेक्षा, ज्यांचा दृष्टिकोन आपल्यासारखा असेल अशी माणसं पाहिजेत या हेतूने घेऊन दोघे भाऊ माणसं एकवटण्याच्या कामाला लागले.

रामूअण्णांनी स्वतः जातीने या नगरीचं नियोजन आणि प्रशासन पाहिलं. शंभूराव जांभेकर हे प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून रुजू झाले, तर के.के. कुलकर्णी हे मॅनेजर म्हणून. मंगेशराव रेगे यांनी क्लार्क आणि अकाउंट विभाग पाहिला, तर इंजिनिअरिंग अर्धवट सोडलेल्या अनंतराव फाळणीकर यांनी इमॅजिनेटिव्ह इंजिनिअरिंग विभाग सांभाळला. लक्ष्मणरावांचा माणुसकीवर इतका विश्वास होता कि, तुरुंगातून सुटलेल्या तुकाराम रामोशी आणि पिऱ्या मांग यांना या नगरीच्या सुरक्षिततेची जबाबदारी दिली.

अशा प्रकारे अनंत अडचणींवर उभी राहत होती ती ‘उद्यम नगरी’ म्हणजेच किर्लोस्करवाडी!

किर्लोस्करवाडी हे भारतातलं जमशेदपूर नंतरचं दुसरं औद्योगिक शहर आपल्या महाराष्ट्रात उभं राहत होतं. (सोच)

जमशेटजी टाटांप्रमाणेच लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या स्वत:च्या उद्योगसमूहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यातून ‘किर्लोस्करवाडी’चा जन्म झाला.  पहिल्यांदा आपल्या ३० कर्मचाऱ्यांची कुटुंबासहित राहायची सोय करत किर्लोस्करवाडी वाढत होती.

लक्ष्मणरावांनी कारखान्याजवळच कामगारांची राहण्याची सोयही केली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत नसल्याने त्यांच्या कामाची गुणवत्ताही वाढीस लागली. (सोच)

लक्ष्मणरावांनी परिसरात शाळा, क्रीडांगणे, पोस्ट ऑफिस अशा सुविधा निर्माण केल्या. मोठे रस्ते, प्रशस्त घरे, उद्याने, विद्यार्थ्यांसाठी शाळा-वाचनालय अशा सर्व सोयींनी सुसज्ज किर्लोस्करवाडी एक आदर्श नगर ठरले.

लक्ष्मणराव स्वत:ही तेथे राहू लागले. प्रखर जातीवाद आणि स्पृश्य-अस्पृश्यता असणाऱ्या त्या वेळच्या समाजात किर्लोस्करवाडी हे असं ठिकाण होतं, जिथं कोणताही जातीभेद पळाला जात नव्हता.

जिथं फक्त एकच जात होती माणुसकीची. एकमेकांच्या चुलीशेजारी चुली मांडून स्वंयपाक बनू लागला. आपोआपच मने जुळत गेली.(सोच)

१५ जानेवारी १९२० मध्ये लक्ष्मणरावांची कंपनी कागदोपत्री रजिस्टर झाली आणि उदयाला आली ती किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड.

पहिल्या महायुद्धानंतर किर्लोस्कर समूहाने ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पाडण्याचे मशीन अशी साधने तयार केली. हातपंपांची सुद्धा निर्मिती केली. (सोच)

एकूण वीस विविध प्रकारचे नांगर, दहा प्रकारचे हातपंप यांसह चाळीस उत्पादने कंपनीमार्फत बनू लागली.

लक्ष्मणरावांचं लग्न राधाबाई यांच्याशी झालं होतं. यंत्र हेच पाहिलं प्रेम असणाऱ्या लक्ष्मणरावांचा संसार राधाबाई यांनी नेटाने फुलवला. (सोच)

लक्ष्मणरावांना ५ मुलं. ४ पुत्र आणि एक कन्या. यातील मोठे शंतनुराव आणि पुतण्या यांना लक्ष्मणरावांनी शिकायला अमेरिकेतील Massachusetts Institute of Technology म्हणजेच MIT मध्ये पाठवलं.

तिथून शिक्षण घेऊन आल्यानंतर शंतनुरावांनी किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडला जणू काही पंखच दिले.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत लक्ष्मणराव स्वदेशीचे खंदे प्रचारक होते. लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः किर्लोस्करवाडीला भेट देऊन त्यांच्या कार्याचा भरभरून गौरव केला. (सोच)

लक्ष्मणरावांची किर्लोस्करवाडी ही यंत्रांसोबतच क्रीडा कला यामध्ये सुद्धा संपन्न होत होती. क्रिकेट, फुटबॉल सारखे खेळ तिथं खेळले जायचे, किर्लोस्करवाडीचा रंगमंच हा बाबुराव पेंटर यांनी बनवलेला त्याकाळचा सर्वात सुबक आणि सुनियोजित रंगमंच होता.

हा असा रंगमंच होता जिथं फक्त स्त्रिया आपल्या कला सादर करायच्या आणि ही त्याकाळची अत्यंत क्रांतिकारी गोष्ट होती.

किर्लोस्करवाडीचा स्वतःचा प्रिंटिंग प्रेस होता, जिथं किर्लोस्कर खबर नावाने एक वृत्तपत्र चालत होतं, तर स्त्री नावाने निघणारं मासिक हे खास स्त्रियांसाठी चालवलं जात होतं.

लक्ष्मणरावांनी किर्लोस्करवाडीत आधुनिक पद्धतीने शेती करायला देखील चालना दिली. तिथली जमीन पाहता त्यांनी द्राक्ष पिकाचं उत्पन्न घेऊन कित्येक शेतकऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली. 

लक्ष्मणरावांचं व्यापाराचं तंत्र अगदी साधं होतं. प्रॉफिट मार्जिन कमी ठेवायचं आणि व्यवसाय वाढवायचा.

आपल्या कर्मचाऱ्यांसोबत बोलताना ते नेहमी तुमची कंपनी असा उल्लेख करत. किर्लोस्करवाडीत होणारे सण समारंभ, कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक, प्रत्येक ठिकाणी केला जाणारा कर्मचाऱ्यांचा विचार यामुळं इथल्या प्रत्येक माणसाला ही कंपनी त्याची वाटायची.

किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड हळू हळू पुणे, बंगलोर येथे देखील पसरू लागली.  

सायकलच्या डिलरशिप पासून सुरु झालेला लक्ष्मणरावांचा प्रवास कुट्टी मशीन, ऊस तोडणी मशीन, लेथ मशीन, टेक्स्टाईल मशीन, भुईमूग सोलणी मशीन, हॅन्ड पंप, हॉस्पिटल फर्निचर करत वाढत गेला.

लक्ष्मणरावांनी रचलेल्या किर्लोस्करवाडीच्या पायाला मुलगा शंतनुराव यांनी त्याला भक्कम आधार दिला, तर पुढच्या पिढ्यांनी त्याच्यावर कळस चढवला.

भारतातील पहिला लोखंडी नांगर, पहिला पंप, पहिलं डिझेल इंजिन, पहिलं इलेक्ट्रिक इंजिन आणि पहिलं लेथ मशिनसुद्धा किर्लोस्करांनीच बनवलं.

आज भारतात टोयोटा कंपनीच्या गाड्यासुद्धा किर्लोस्करांचीच कंपनी बनवते.

लक्ष्मणरावांना औंध संस्थानचे दिवाण म्हणून 1935मध्ये नेमण्यात आले.

किर्लोस्करवाडीच्या ४० व्या वर्धापन दिनी ८१ वर्षाचे लक्ष्मणराव आणि ९१ वर्षाचे रामूयाण्णा किर्लोस्करवाडीला भेट द्यायला आले.

आजारी असणाऱ्या लक्ष्मणरावांना त्यांचा मुलगा पुण्यात औषधोपचारासाठी बोलवत होता, तेव्हा ८१ वर्षाच्या या तरुणाचे उद्गार होते कि, “जोपर्यंत पहिलं ऑइल इंजिन तयार होऊन बाहेर येत नाही, तोपर्यंत मी इथून कुठंही जाणार नाही.”

अखेरीस डिसेंबर १९४८ ला पाहिलं इंजिन तयार झालं आणि लक्ष्मणराव पुण्याला गेले. बंगलोर वरून पुण्याला जाताना त्यांनी आपलं विमान किर्लोस्करवाडीवरून घ्यायला सांगितलं.

बदाम कायम भिजवलेले का खावे?

मोफतसंपूर्ण आरोग्य विषयक माहिती साठी subscribe करा

एका ओसाड जमिनीला यंत्र, तंत्र आणि माणसांच्या साहाय्यानं जिवंत झालेलं पाहून ते भरून पावले. तिथल्या उंच इमारती, रस्ते, कंपन्या, माणसांची वर्दळ हे सारं डोळ्यात भरून अभिमानाने ते पुण्यात आले.

आज किर्लोस्कर ग्रुप ७० देशांत पसरलेला असून ग्रुपच्या २६ कंपन्यांमध्ये १८००० हून अधिक जण काम करत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगातील अनेक मोठमोठ्या इमारतींमध्ये;

मग ते दुबईतील बुर्ज खलिफा असो की अमेरिकेतील न्यू वर्ल्ड ट्रेड सेंटर… सिंगापूरचं मरीना बे असो की ऑस्ट्रेलियातील ओपेरा हाऊस…

तिथे किर्लोस्करांचेच पंप तुम्हाला बघायला मिळतील…. एक भारतीय म्हणून आणि त्याठी एक मराठी माणूस म्हणून ही आपणा सर्वांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.

‘काम करत राहा, प्रयत्न कधीही सोडू नका. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल’ हे सांगणाऱ्या भारताच्या या ‘हेन्री फोर्ड’ने अखेरीस २६ सप्टेंबर १९५६ रोजी जगाचा निरोप घेतला.

त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने २० जून १९८९ मध्ये त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले. या महान उद्योजकाचा आदर्श घेऊन भविष्यात हजारो मराठी उद्योजक तयार होतील अशी खात्री आहे.(सोच)

तर ही होती लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांची जीवनकहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो जाताना सबस्क्राइब करायला विसरू नका.

4 thoughts on “आगे बढ़ने के लिए जेब नहीं, सोच बड़ी होनी चाहिए : लक्ष्मणराव किर्लोस्कर”

Leave a Comment