लैंगिक जाण आणि लहान मुले: समाजाला पडलेला महत्त्वाचा प्रश्न

मुलांना ‘सेक्स’विषयी सांगण्याचे,  योग्य ते मार्गदर्शन करण्याचे नेमके वय कोणते असा प्रश्न विचारला तर काही  वाचकांना आश्चर्य वाटेल, काहींना अनावश्यक तर काही याविषयी उत्सुक असतील. ‘सेक्स’ हा विषय आपल्याकडे लज्जास्पद किंवा गोपनीय मानला जातो. लैंगिक आरोग्य, स्वच्छता, संमती, शारीरिक सीमा, वैयक्तिक स्पेस, सुदृढ नाते, लैंगिक संवेदनशीलता, लैंगिक ओळख आणि शारीरिक हक्क अशा विस्तृत अर्थाने आपण विचार करत नाही. 

पुढील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न पालकांनी करायला हवा : १. तुम्हाला सर्वात आधी ‘सेक्स’बद्दल कधी समजले आणि कसे? (अपघाताने किंवा शाळेतल्या वर्गात, समवयस्कांकडून की तुमच्या पालकांकडून ?) 

२. तुम्हाला त्यावेळी कसे वाटले होते ? (गोंधळ उडाला होता, चकित झाला होतात, शिसारी आली होती, चिंता वाटली होती, आतुर झाला होतात, इ.) 

३. मिळालेली माहिती पुरेशी स्पष्ट आणि वयाला साजेशी होती का? 

४. त्यावेळी तुमच्या मनात प्रश्न, शंका किंवा कोणत्या भावना प्रकर्षाने आल्या होत्या ? 

५. मोठ्यांना ह्याविषयी विचारताना तुम्हाला सुरक्षित किंवा ‘कम्फर्टेबल’ वाटले होते का? 

६. या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली का प्रश्नच टाळण्यात आले ? 

७. तुमच्या मुलांशी ‘सेक्स’विषयी संवाद साधण्याचे योग्य वय कोणते ?

किशोर वयातील मुले त्यांच्या समवयस्कांशी या विषयावर चर्चा करतात. ते असे करत नसतील किंवा ‘पोनोग्राफी’ पाहण्यास इच्छुक नसतील तर त्यांची खिल्लीदेखील उडवली जाऊ शकते. आजच्या काळात ऑनलाइन माहिती मिळणे सोपे झाले आहे, पण आपण काय पाहत आहोत हे कळण्याइतकी समज मुलांना असेलच असे नाही. इंटरनेटवरील “सेक्स संबंधित माहिती त्यांच्यासाठी कदाचित भारावून टाकणारी तशीच असुरक्षितही असू शकते. पण ही माहिती लैंगिक आरोग्याबाबतीत सर्व योग्य पैलूंवर प्रकाश टाकणारी असेलच असे नाही. 

दुसरीकडे, मुलींना मासिक पाळीतील आरोग्य आणि स्वच्छता याविषयी शाळेत नियमितपणे माहिती | देण्याऐवजी एखाद्या सत्रात मर्यादित माहिती दिली जाते. खरे तर शाळेत शरीर संरक्षण, लैंगिक आरोग्य व स्वच्छता या बाबतीत माहिती द्यायला हवी. प्रत्येक मानवी शरीरात बदल होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी त्याबद्दल एक प्रकारचे मौन किंवा अस्पष्टता आपल्याकडे दिसून येते. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आकर्षण निर्माण होऊ शकते, हा विचारच भारतात अनेकदा मान्य केला जात नाही. मुलींना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल सतत सतर्क आणि जागरूक राहण्यास सांगितले जाते. पण त्यांचे सबलीकरण करण्याऐवजी त्यांच्यावर बंधने आणली जातात. 

शाळांमध्ये लैंगिक शिक्षण आणि |शरीराच्या सुरक्षिततेविषयी माहिती देणे बंधनकारक असले तरी अनोळखी व्यक्तींपासून असलेला धोका आणि शरीराच्या कोणत्या अवयवांना स्पर्श केला जाऊ नये, इथपर्यंतच हे मार्गदर्शन मर्यादित राहते. या सत्रात शरीराची सुरक्षितता आणि लैंगिक शोषणाच्या सर्व बारकाव्यांबद्दल चर्चा होईलच असे नाही उदा. अनोळखी

 व्यक्तीपासून संरक्षण कसे करावे हे माहीत असणे जितके आवश्यक आहे तेवढेच एखाद्या ओळखीच्या व्यक्तीपासूनही (उदा.नातेवाईक, शेजारी) त्यांना धोका असू शकतो, हे माहीत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याबद्दल कुटुंबातील त्यांच्या विश्वासू व्यक्तीला हे सांगणे सुरक्षित आहे हेही त्यांना माहीत असायला हवे. धोक्याच्या परिस्थितीत काय करावे याबद्दल त्यांना निश्चित कल्पना द्यायला हवी. त्यांना ‘चाइल्ड लाइन’ (१०९८) आणि विश्वासार्ह प्रौढांचे (आई, वडील, मावशीकाकू, आजी-आजोबा) नंबर देऊन ठेवावेत, जेणेकरून ते अशा असुरक्षित परिस्थितीत मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. 

सुदृढ मानसिक विकासासाठी संमती हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मुलांनी ‘नाही’ म्हणणे हे उद्धटपणाचे लक्षण मानले जाते, पण मुलांना कुटुंबातील सदस्याचे मिठी मारणे, मुका घेणे किंवा हात मिळविणे आवडत नसेल तर ते ‘नाही’ म्हणू शकतात, हे त्यांना शिकवायला हवे. जसे दुसऱ्याचे पुस्तक घेताना परवानगी घ्यावी लागते, तसेच दुसऱ्या कुणालाही स्पर्श करताना, मिठी मारताना, हात पकडताना किंवा मुका घेताना परवानगी घेणे आवश्यक असते, हे त्यांना समजेल. त्याचप्रमाणे आपले मूल इतर प्रौढ व्यक्तीसोबत असताना ‘कम्फर्टेबल’ आहे की नाही, याची जाणीव पालकांनाही हवी. 

मुलांच्या वयाप्रमाणे लैंगिक आरोग्य, मर्यादा आणि शारीरिक सुरक्षितता या विषयावर चर्चा करायला हवी : 

१. लहान मूल (वयोगट १-३ ) : शरीराचे कोणते भाग झाकलेले असतात आणि कोणत्या अवयवांना इतरांनी हात लावता कामा नये, हे बाहुल्यांच्या माध्यमातून मुलांना दाखवता येते. २. बालके ( वयोगट ४-९ ) : या वयोगटातील मुलांना शरीराच्या अवयवांची नावे सांगणे आणि या अवयवांना कुणीही हात लावू शकत नाही, पाहू शकत नाही किंवा याबद्दल त्यांच्याशी बोलू शकत नाही हे समजावून सांगणे. आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न असेल तर या अवयवांना हात लावला जातो, पाहिले जाते किंवा त्याबद्दल बोलले जाते हे सांगणे (उदा. पालक किंवा डॉक्टर). जर एखाद्याने या मर्यादा ओलांडल्या तर कुणाकडे जायचे, हेही त्यांना सांगून ठेवा. 

३. पौगंडावस्था ( वयोगट १०-१२ ) : हार्मोन्समुळे शरीरात होणाऱ्या बदलांसाठी त्यांनी मानसिक व भावनिकदृष्ट्या कसे तयार व्हावे, याविषयी त्यांना सांगणे. 

४. वयोगट १३-१७ : लैंगिक आरोग्य, शरीराची स्वच्छता, शारीरिक सीमारेषा, सुदृढ नाती आणि आकर्षण या विषयी मुलांशी संवाद साधावा. 

५. १८+ मुलांचा वयोगट 

सुरक्षित संभोग याविषयी विस्तृत चर्चा (लैंगिक माध्यमातून संक्रमित होणारे आजार, गर्भनिरोधक उपाययोजना, प्रेमाच्या आणि / किंवा लैंगिक नात्यामध्ये सुरक्षित आणि असुरक्षित नाते याविषयी विस्तृत संवाद साधणे). 

पालक, मार्गदर्शक, शिक्षक म्हणून मुलांसाठी पुढील पावले उचलता येतील : 

१. विश्वासार्ह, संवेदनशील, नैतिक व्यावसायिक मार्गदर्शकांनी लिहिलेले लेख वाचणे, व्हिडिओ पाहणे.

२. शाळेत लैंगिक शिक्षणाबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची समिती तयार करण्याची मागणी शाळेकडे करणे. 

३. मुलांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असतीलच असे नाही, हे मान्य करणे आणि त्याविषयी जाणून घेण्याची तयारी असणे, 

४. मुलांच्या प्रश्नांकडे काणाडोळा न करता त्यांचे म्हणणे जाणून घेणे. 

५. मुलांशी सकारात्मक नाते तयार करणे, वयाला साजेसे मार्गदर्शन करणे, सहानुभूतीशील असणे, समजून घेणे, ते स्वतंत्र व्यक्ती आहेत याचा आदर करणे. ममत्व व्यक्त करणे ( जोपर्यंत मूल कम्फर्टेबल आहे तोपर्यंत), ज्या प्रश्नांची विस्तृत उत्तरे द्यावी लागतील असे प्रश्न विचारणे, मुलासोबत वेळ घालविणे, गोष्टी सांगणे, बोर्ड गेम्स खेळणे इत्यादी मार्गांनी तुम्ही तुमचे नाते अधिक सुदृढ करू शकाल. मुलांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होईल.

एक असा समाज, जिथे प्रत्येकाला आपल्या अवकाशाची (स्पेस) जाणीव असेल आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींच्या स्पेस बद्दल आदर असेल, जिथे मुलांना त्यांच्या

शरीराविषयी आणि शरीराच्या मर्यादांविषयी माहिती आणि ज्ञान असेल. ही माहिती घेताना कोणत्याही प्रकारची लाज त्यांना वाटणार नाही, तर उलट प्रेम व आदरच वाटेल. अशा समाजाचा विचार करून पाहा. या शक्यतेमध्ये आणि आशेमध्ये समाजाला लैंगिक शिक्षण देण्याचे मूल्य सामावलेले आहे.

Leave a Comment