आयुष्यात पैशाचे योग्य (आर्थिक) नियोजन नसल्यावर समाजात घडणाऱ्या घटना पहा. मुलगी लग्नाला आली, पैसे नाहीत. मग मित्रांकडे, पाहुण्यांकडे हात पसरतो, जमीन विकतो, कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे घेतो.
अचानक आजारी पडला, अपघात झाला, दवाखान्याचा मोठा खर्च, पैसे नाहीत, काय करायचे? उसने पैसे मागा, जमीन विका, दागिने गहाण टाका.
मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, कर्ज काढा, जमीन विका. हे सर्व होते, योग्य आर्थिक नियोजन नसल्यामुळे.
आपण बऱ्याचदा पाहतो, म्हसोबाला बोकड कापतो, पाच हजार खर्च, ताईबाईला सवासण्या घालतो, दोन हजार खर्च, सत्यनारायण पुजा घालणे, चार हजार खर्च.
असे एका कुटुंबाचे वर्षाला ३० ते ४० हजार रुपये वायफळ खर्च होतात; पण पर्सनल फायनान्स, गुंतवणूक, उद्योग, करिअर प्लॅनिंग, आरोग्य इत्यादी विषयी पुस्तके खरेदी करण्यात एक हजार रुपये तरी आपण खर्च करतो का?
जर आपण अर्थसाक्षर होणारच नाही, तर मग आपण श्रीमंत होणार कसे.
आजारपण, अपघात सांगून येत नाही हे आपणास माहीत आहे, मग आपण आरोग्य विमा काय असतो याचा अभ्यास केला आहे का?
मुलीच्या लग्नासाठी खर्च येतो माहित आहे, मग तिच्या जन्मापासूनच आपण काही गुंतवणूक का करीत नाही? मुलाच्या शिक्षणाचा मोठा खर्च १२वी नंतर सुरू होतो, मग त्यासाठी आपण काय प्लॅनिंग करतो.
आपला महिन्याला येणारा पगार, उत्पन्न सर्व जगण्यावरच खर्च होतो. बचत व गुंतवणूकीच्या नावाने बोंबाबोब चालू असते. महिन्याच्या पगारात घरखर्च चालत नाही, तर बचत काय व कशी करणार.
त्यामुळे आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे, नाहीतर महाभयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल.
आत्महत्या, कर्जाचा बोजा सहन न होणे, खाजगी सावकाराला संपत्ती जाणे, जप्ती, पैशाअभावी उपचार न मिळाल्याने मरण, आर्थिक नियोजन नसल्याने उतारवयात वृध्दाश्रमाची वाट धरायला लागणे अशा अनेक घटना आपण समाजात नेहमी पाहतो.
तसेच पैशांअभावी मुलांची करिअर थांबणे, मुलींचं लग्न न होता कुठल्यातरी मुलाबरोबर पळून जाणे अशा नामुष्कीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते.
ज्यांनी आपल्या जमिनी विकल्या, त्या आर्थिक नियोजन नसल्यामुळेच.
आज प्रत्येक महिन्याला १ हजाराची बचत व गुंतवणूक भविष्यात खूप मोठ्या कामाला हातभार लावू शकते.
देव, उपासतापास, नवस, राजकारण, साड्या, आहेर, रुसवेफुगवे, मोर्चे, आंदोलने, पक्ष ह्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने आर्थिक साक्षरतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आर्थिक निरक्षरता ही समाजाला किती महागात पडली आहे, गेल्या ५-६ दशकात समाज कसा गरीब होत चालला आहे हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे ‘पैशाला पैसा लावावा, पैशाने पैसा वाढवावा.’
हाती असलेल्या प्रत्येक रुपयात तुमचं नशीब बदलू शकतं, पण ते बदलणं फक्त तुमच्या हातात आहे. तुम्ही ते पैसे विचार न करता कुठेही खर्च केले, तर तुम्ही गरीबच राहाल.
कर्जफेडीत घालवले, तर मध्यमवर्गीय राहाल.
पण जर तुमच्या मनावर गुंतवले आणि संपत्ती कशी मिळवायची याचं शिक्षण घेतलं, तर तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल.
गौतम अदानी ची ही प्रेरित करणारी छोटीशी गोष्ट:
4 लाख कोटी नेटवर्यचे गौतम अदानी देशात दुसरे सर्वात श्रीमंत
वचने पाळण्याची, वाचण्याची सवय लावा, प्रगती झपाट्याने होईल… वयाच्या १६ व्या वर्षी अभ्यास सोडून कामाला लागलेले अदानी म्हणतात- वडिलांकडून त्यांना दोन मोठ्या गोष्टी शिकायला मिळाल्या.
प्रथमः स्वतःला दिलेली वचने पूर्ण करा, इतरांना दिलेली वचने कोणत्याही परिस्थितीत पाळा.
दुसरा: कोणत्याही परिस्थितीत अतिशयोक्ती करू नका. तुमच्या आतून येणारा आवाज ऐकून लगेच निर्णय घ्या.
• प्रत्येक पाऊल ध्येयाकडे ठेवा. ध्येयाचा पाठलाग करत राहा. वैयक्तिक हेतू गरजेचा आहे. मी रोज २ तास अभ्यास करतो.
• लोकांच्या आयुष्यात तंत्रज्ञान काय बदलतय, जाणून घेण्यासाठी मी वर्षातून २-३ वेळा सिलिकॉन व्हॅलीला जातो. मी अशा क्षेत्रांबद्दल शिकतो, ज्याबद्दल मला कमी ज्ञान आहे. मार्गात येणाऱ्या संघीसाठी तयार राहणे, आणि त्याचा फायदा घेणे शिका.
रतन टाटा व धीरूभाई अंबानी यांची एक शिकण्यासारखी कहाणी
एका इंग्रजी वाहिनीवर रतन टाटा यांना एक प्रश्न विचारण्यात आला कि टाटा साम्राज्य १०० पेक्षा जास्त वर्षे भारतात कार्यरत आहे परंतू ५० वर्षेही न झालेला रिलायन्स गृप हा जास्त झपाट्याने प्रगती करून बाजारमूल्याच्या बाबतीत एक नंबरला पोहोचला आहे हे कसे काय?
रतन टाटा यांनी त्वरित पण हसत हसत जे उत्तर दिले ते अनेक – अनेक पैलूंनी विचार करण्यासारखे आहे. टाटा म्हणाले कि, ‘Ambanis are true businessmen, however Tatas are true industrialists’.
खरे तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी दिले आहे. टाटा हे उद्योजक आहेत आणि अंबानी व्यावसायिक.
Beyond the Last Blue Mountain नावाचे एक पुस्तक आहे ज्याचा मराठी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्यापूर्वी मला टाटा समूहाविषयी आदर होता पण हे पुस्तक वाचल्यावर तो आदर हिमालयइतका मोठा झाला. ….. जरूर वाचा.
अंबानींनी प्रत्येक नवा उद्योग हा आपली संपत्ती वाढावी म्हणून सुरु केला पण जर तुम्ही टाटा उद्योगाचा इतिहास बघितलात तर असे दिसेल कि त्यांचे अनेक उद्योग हे सुरु होतानाच नुकसानीत जाणार हे दिसत होते पण देशहित म्हणून त्यांनी ते सुरु केले.
टाटा मोटर्स चे पहिले नाव होते टाटा लोकोमोटिव्ह अँड इंजीनियरिंग .. आगगाडीचे इंजिन आणि रूळ तयार करण्यासाठी हि कंपनी सुरु केली ती सुद्धा फक्त ३% ठोक नफ्यावर. त्यातही भारत सरकारने अनेकवेळा आपला शब्द फिरवला ज्यामुळे टाटांचे नुकसान झाले.
जेव्हा भारत सरकारने चित्तरंजन लोकोमोटिव्ह सुरु केले तेव्हा मात्र टाटा या उद्योगातून बाहेर पडले आणि कंपनीचे नाव झाले टाटा इंजीनियरिंग अँड लोकोमोटिव्ह आणि आता टाटा मोटर्स.
टाटांचा ट्रक हा १००% भारतीय बनावटीचा असावा असा हट्ट त्यांचा होता.
भारतीय जर लोखंड बनवणार असतील तर मला ते लोखंड फुटाणे म्हणून खायला आवडेल हे वाक्य ऐकल्यावर टाटांनी टाटा स्टील सुरु केली आणि हे वाक्य म्हणणाऱ्या विदेशी लोकांची मोठी कंपनी विकत घेतली.
BARC जे जनक टाटा. यातून काय नफा मिळणार होता ?
CSO हे जनक टाटा. यातून काय नफा मिळणार होता ?
जहांगीर आर्ट्स गॅलरी तर बरेच वेळा नुकसानीत जायची – काहीही नफा नाही.
भारतात सुपर कॉंप्युटर देण्यास अमेरिकेने नकार दिल्यावर टाटांनी एक महासंगणक तयार करून भारत सरकारला दिला – मार्जिन फक्त ३%. काय नफा मिळाला हे करून ?
टाटांचा एक अपमान झाला म्हणून जुने हॉटेल ताज उभे राहिले. इंडियन हॉटेल्स चा इतिहास वाचा.
टाटा केमिकल्सचा इतिहास वाचा. सयाजीराव गायकवाड यांच्या विनंतीला मान देऊन हि कंपनी सुरु झाली जी अनेक वर्षे नुकसानीत गेली.
इंडियन एअर लाईन्स चा इतिहास वाचा. टाटा साम्राज्यावर किती अन्याय भारत सरकारने केला आहे पण टाटांनी आपला आदर्शवाद बदलला नाही.
अजमल कसाबच्या हल्ल्यात ताज हॉटेलच्या व्यवस्थापकाची पत्नी आणि दोन्ही मुले बळी पडली त्या व्यवस्थापकाला नंतर कशी सन्माननीय वागणूक मिळाली.
आणि अंबानींच्या पाताळगंगाच्या कारखान्यात स्फोट झाल्यावर अनेक माणसे त्यात बळी पडली त्यांचे काय झाले हे तुम्हाला त्यांचा एखादा कर्मचारीच सांगू शकेल. आणि म्हणूनच, टाटा हे उद्योजक आहेत आणि अंबानी व्यावसायिक..!
तुम्हीही आर्थिक साक्षर व्हा आणि त्यासाठी काय करणार हे आम्हाला नक्की सांगा आणि विषय आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी आपलं सरकार ला फॉलो करा.