आयुष्याला चक्रावून टाकणारी चक्कर येणे

व्हर्टिगोच्या (चक्कर येणे) रुग्णांची संख्या हल्ली वाढत आहे.

प्राथमिक लक्षणे आणि प्रकार : 

● आपल्या चालताना मध्येच आजूबाजूला गरगरणे. 

● एका जागी उभे असताना अचानक डोळ्यांसमोर अंधारी येऊन गरगरणे. 

 ● तोल जात असल्याची भावना निर्माण होणे. 

● झोपल्यावर पाठीवरून कुशीवर होताना पडत असल्याचा भास होणे. 

● खाली वाकले असता डोके एकदम हलल्यासारखे होणे.

● बसलेल्या स्थितीतून झटकन उठल्यावरही घेरी आल्यासारखे वाटणे. 

● उंचावरून खाली पाहताना भोवळ येणे. 

थोडक्यात काय, तर शारीरिक अवस्थेत चटकन झालेल्या बदलामुळे चक्कर येते. ही चक्कर साधारण १० ते २० सेकंद टिकते, हिला ‘तात्पुरती चक्कर’ म्हणतात.

पण जी चक्कर १० ते २० मिनिटे टिकते आणि आराम केल्यावरच थांबते, तिला ‘लघुकाळ किंवा अल्पकाळ चक्कर’ म्हणतात.

अशी चक्कर परत परत येत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

दीर्घ/प्रदीर्घ काळ चक्करoo: 

काही रुग्णांमध्ये सर्व चाचण्या, इलाज करूनही अशी चक्कर बरी होत नसल्याचे दिसून येते. ज्या रुग्णांमध्ये अशी चक्कर दीर्घ काळ टिकून राहिली आहे व त्रासदायक बनली आहे.

त्या रुग्णांचे संशोधन केल्यावर असे दिसून आले, की त्यांच्यापैकी ६० ते ७० टक्के रुग्ण हे बेचैनी आणि नैराश्य या मानसिक समस्यांनी ग्रस्त असतात.

व्हर्टिगोची (चक्कर) कारणे

१) अॅनिमिया (रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता असणे) 

२) वाढलेला रक्तदाब 

३) मधुमेह 

४) आकडी येणे 

५) कानाचे आजार 

६) मेंदूतील रक्तवाहिनी गोठणे 

७) मेंदूत आलेली गाठ 

८) तंबाखूदारूचे अतिसेवन 

९) लॅपटॉप आणि मोबाइलचा वाढलेला प्रचंड वापर. 

व्हर्टिगो हा आजार प्रामुख्याने कानाच्या आतमध्ये पुरेसा रक्तप्रवाह न झाल्यामुळे उद्भवतो.

कधीकधी साध्या थंडी-तापाचे सामान्य विषाणूसुद्धा कानाचा आतील भाग जो मेंदूशी जोडलेला असतो, तिथे हल्ला करतात आणि त्यामुळे भोवळ येण्याची शक्यता असते.

माणसाच्या कवटीला झालेले नुकसान, विशिष्ट खाद्यपदार्थ किंवा धूळ यांची अॅलर्जी, मज्जासंस्थेशी निगडित आजारामुळेसुद्धा व्हर्टिगोचा त्रास होऊ शकतो. 

दीर्घ काळ असणाऱ्या व्हर्टिगोचे मानसशास्त्र : 

चिंताग्रस्तता, बेचैनी, औदासीन्य, नैराश्य या व अशा इतर अनेक मानसिक आजारांचा शरीरावर अनिष्ट परिणाम होतो आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, अर्धशिशी (Migraine), व्हर्टिगों यांसारखे आजार माणसाच्या शरीरात नकळत प्रवेश करतात. 

मेंदूकडून शरीराला देण्यात येणाऱ्या संवेदनांचे वर्गीकरण, आकलन, पृथक्करण व अचूक निष्कर्ष मोठ्या मेंदूच्या विशिष्ट भागांत केले जाते. 

त्या संवेदनांवर योग्य असा निष्कर्ष व कृतीचे आदेश मोठ्या मेंदूतून दिले जातात.

मेंदूत हे काम असंख्य मेंदूपेशी करतात. या पेशींमध्ये विशिष्ट प्रकारची अनेक द्रव्ये न्यूरोट्रान्समीटर्स काम करत असतात.

त्यापैकी सेरोटोनिन व नोरेड्रेनेलिन ह्या महत्त्वाच्या द्रव्यांचे प्रमाण कमी झाल्यास मेंदूकडून संवेदनांचे चुकीचे अंदाज व निष्कर्ष काढले जातात.

ह्या द्रव्यांच्या कमतरतेमुळे शरीरातील हालचाल करणाऱ्या अवयवांतून तोल राखण्यासाठी येणाऱ्या संवेदनांचे अचूक निष्कर्ष न निघता अस्थिरता, चक्कर, तोल जाणे ह्या विपरीत संवेदनांत परिवर्तन होते व सतत चक्कर जाणवते. 

दीर्घ काळ असणाऱ्या चकरीचे रुग्ण निदान होताना…. 

असे आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा बहुतांश वेळा न्युरोलॉजिस्ट अथवा कान, नाक, घसा तज्ज्ञांकडे वारंवार जातात.

पण नेमके निदान होईलच याची शाश्वती नसते. अशा वेळी मूळ आजाराऐवजी एखाद्या तक्रारीवर व्हिटॅमिन्सच्या गोळ्या, आयर्न टॉनिक असे औषध दिले जाते.

काही वेळेस नामसाधर्म्य असणाऱ्या गोळ्या दिल्या जातात. उदा.- व्हर्टिन, व्हर्टिगॉन, स्टेमेटिल, स्ट्युगेरॉन इ. या औषधांमुळे किंचितसा पण असमाधानकारक असा फायदा होतो. 

नाइलाज म्हणून रुग्ण आयुष्यभर हा त्रास सोसत राहतात. या सर्वांचा रुग्णाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत जातो.

चालण्याची, काम करण्याची, वाकण्याची, बाहेर पडून कामावर जाण्याचीसुद्धा रुग्णाला भीती वाटू लागते. 

दीर्घकालीन चक्कर उपचार :

काही वेळेस योग्य ते निदान आणि उपचार होऊनसुद्धा चक्कर थांबत नसल्यास रुग्णाने मानसोपचार तज्ज्ञाकडे (Psychiatrist) जायला हवे.

हा त्रास ‘दीर्घ / प्रदीर्घ काळ चक्कर’ (चिवट चक्कर) चा प्रकार असू शकतो.

सखोल तपास व अभ्यास आणि मानसिक विश्लेषण केल्यानंतर या भावनिक, मानसिक आजाराचे निदान होऊ शकते.

ही समस्या समूळ नाहीशी करणारे औषधोपचार दिल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. 

अशी घ्या काळजी: चक्कर

आपण झपाट्याने करत असणाऱ्या कामांमुळे मेंदूला झटका बसतो. व्हर्टिगोचा त्रास कमी करण्यासाठी या क्रिया सावकाश करायला हव्यात.

मेंदूचे काही गंभीर आजार वगळता व्हर्टिगोची समस्या असणाऱ्या बाकी रुग्णांना व्यायामाने बराच फरक पडू शकतो.

या आजारावर अधिक प्रमाणात औषधे घेण्याऐवजी फिजिओथेरपी किंवा काही मानेचे व्यायाम करावेत. मात्र यासाठी आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

अचानक हालचाल करणे टाळा, उठता-बसताना सावकाश हालचाली करा, झोपून उठताना सावकाश कुशीवर वळून, हातावर जोर देऊन उठून बसावे व मग सावकाश उभे राहावे.

या प्रकाराने मेंदूस संदेश पोहोचविण्याच्या कामाला वेळ मिळतो आणि ही समस्या कमी होत जाते.

Leave a Comment